‘कोरकु’ आदिवासी महिलांचे सांस्कृतिक जीवन
आपल्यासारखीच भूक इतरांनाही लागू शकते याचा विचार करुन आपल्यातलेच दोन घास इतरांना देणे, ही आहे ‘कोरकु’ आदिवासींची आदर्श संस्कृती. तर अशा या ‘कोरकु’ आदिवासी महिलांची संस्कृती नेमकी कशी आहे? त्यांचे रीतीरिवाज, रुढी, परंपरा कोणत्या आहेत ! याचा विचार प्रस्तुत शोधनिबंधातून करण्यात आला आहे. आजच्या आधुनिक जगातील महिलांचे, त्यांच्या जगण्याचे अवलोकन केल्यास ह्या महिला जीवनातील निखळ आनंदाला पारख्या झालेल्या दिसतात.
कोरकु-आदिवासी जमात, शिक्षण, कुपोषण!
प्रस्तावना :
भूक लागली की खाणे म्हणजे प्रकृती, भूक नसताना खाणे म्हणजे विकृती आणि…………
आपल्यासारखीच भूक इतरांनाही लागू शकते याचा विचार करुन आपल्यातलेच दोन घास इतरांना देणे, ही आहे ‘कोरकु’ आदिवासींची आदर्श संस्कृती. तर अशा या ‘कोरकु’ आदिवासी महिलांची संस्कृती नेमकी कशी आहे? त्यांचे रीतीरिवाज, रुढी, परंपरा कोणत्या आहेत! याचा विचार प्रस्तुत शोधनिबंधातून करण्यात आला आहे.
आजच्या आधुनिक जगातील महिलांचे, त्यांच्या जगण्याचे अवलोकन केल्यास ह्या महिला जीवनातील निखळ आनंदाला पारख्या झालेल्या दिसतात. परंतु आजही आधुनिक प्रगत समाजापासून दूर दरी–खोऱ्यात पाड्यावर राहणारी ‘कोरकु’ आदिवासी महिला कसे जीवन जगत असेल याची केवळ कल्पना केलेली बरी, पण तरीही त्या आनंदी दिसतात. जीवनातील कठीण प्रसंगातसुद्धा त्या निखळ आनंद मानतात. त्या आपल्या पोटासाठी रानावनात अनवाणी पायाने कंदमुळे शोधत फिरतात. दिवसभर शेतात राबतात, पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात भटकून सरपण गोळा करतात, म्हणजेच जीवनाचा प्रत्येक क्षण त्या संघर्षमय रीतीने जगतात. त्यांच्याही जीवाला यातना होत असलीलच ना ! त्यांनाही मन आहे, भावना आहेत. पण त्यांच्या भावनांना ह्या भावनाशून्य जगात किंमत देणार कोण ? त्यांची आर्त हाक ऐकणार कोण ! पण तरीही अतोनात काबाडकष्ट करणारी ही ‘कोरकु’ आदिवासी महिला प्रतिकूल परिस्थितीतही जीवन जगताना रडत बसत नाही, तर प्राप्त परिस्थितीशी चार हात करत ती आपले जीवन आनंदाने जगते, तिच्या आनंदी जीवनाचे गमक काय? या गोष्टींचा विचार करता त्यांनी आपल्या जीवनात जपलेल्या ‘सांस्कृतिक वैभवाचा’ विचार करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने ‘आदिवासी लोकसाहित्य’ व ‘आदिवासी लोककला’ यांचा समावेश होतो. ‘कोरकु’ आदिवासी महिला ही रोजच ‘लोकसाहित्यात’ जगते. रोज सकाळी लवकर उठणारी ‘कोरकु’ आदिवासी महिला सर्वप्रथम चूल पेटविताना देखील प्रथम आपल्या चुलीला ‘पोचारा’ फिरवते. चुलीवर शिजवलेल्या अन्नाचा एक घास अग्नीदेवाला समर्पित करते आणि मग सर्वानी अन्नाचे सेवन करावे हा दंडक ती स्वत: पासून सर्व कुटुंबियांना घालून देते, ही संस्कृती पाहताना, ऐकताना नागरी समाजाला कदाचित वेडेपणाही वाटेल. परंतु ही वस्तुस्थिती आहे. अन्नदेवता प्रसन्न राहण्यासाठी अग्नीला अन्न दिल्याने घरात सुखसमाधान लाभते असल्या दैवी धारणांवर तिचे जीवन सकाळ पासूनच सुरू होते.
‘कोरकु’ आदिवासी महिलेच्या जगण्यात भोळेपणा व सहजता आहे. सत्याची काम व प्रामाणिकपणा तर त्यांच्या रक्तातील अनुवंशिकताच दर्शविते. कमी साधनसंपत्ती, अल्प अर्थार्जन व आहे त्यात समाधान मानून जगण्याची वर्तमानकालीन वृत्ती त्यांच्या आनंदी जीवनाचे गमक आहे. आपल्या रुढी, प्रथा, परंपरा, रीतीरिवाज, यांना ‘कोरकु’ आदिवासी महिलांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. जन्मापासून ते जीवनाच्या आतापर्यंत त्या जे जगतात, त्या जगण्याचे आविष्करण त्यांच्या ठायी होते.
‘कोरकु’ आदिवासी महिला ही रुढी, परंपरा यांची पाईक आहे. ‘कोरकु’ आदिवासीची संस्कृती आणि जीवनमूल्ये वेगळी आहेत. आपले वेगळेपण, सांस्कृतिक मूल्ये जपण्यासाठी त्या शांतपणे, एकाकी, दऱ्याखोऱ्यात, पाड्यावर अलगपणे राहतात म्हणून त्यांना एकांतपणा हा बुजरेपणा हेावू शकत नाही. ‘स्वाभिमान, विश्वास आणि सत्याचरण,’ या त्रितत्वावर ‘कोरकु’ आदिवासी समाजाची बैठक भक्कम पायावर उभी आहे.
निसर्गाच्या जीवनाशी आपले जीवन जुळवून घेणे हा ‘कोरकु’ आदिवासींचा आदिधर्म आहे; म्हणूनच त्यांच्या दैवी संकल्पना व धर्मकल्पना निसर्ग सापेक्ष आहेत. डोंगरदऱ्या, दगडमाती, झाडे–झुडपे, पाखरं, वन्यपशू, नद्या ही त्यांची आद्य कुळदैवत आहेत. जमीनीला तर ते आपली माता समजतात. तिची पूजा करतात. या धरतीमातेला येता–जाता आपले पाय लागतात; म्हणून तिच्या विषयीचा कृतज्ञताभाव व्यक्त करताना जसे वारली आदिवासीच्या एका लोकगीतात म्हटल्याप्रमाणे:–
“अथं नाचू का कोठ रं नाचू
धरतरीच्या पाठीवर
धरती माझी पायूरं
तिला मी पाय कसा लावू रं
अथं नाचू का कोठ रं नाचू
कणसरीच्या माथ्यावर
कणसरी माझी मायूरं
तिला मी पाय कसा लावू रं
अशा प्रकारे निसर्गाप्रती कृतज्ञता व मानवी मूल्यांनी भरलली उदात्त संस्कृती फक्त ‘कोरकु’ आदिवासीमध्येच आहे.
दुर्गम आणि दऱ्याखोऱ्यात पाड्यावर राहणाऱ्या ‘कोरकु’ आदिवासी महिलांनी ‘आपली लोकसंस्कृती’ जपली आहे. जशी नगर समाजात ‘वेदसंस्कृती’ आहे . तशीच ‘कोरकु’ आदिवासींची ही लोकसंस्कृती त्यांच्या जीवनात उभारी देण्याचे कार्य हजारो वर्षापासून करीत आलेली आहे. निसर्गपूजेला त्यांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मानवी आरोग्य आणि जीवनातील सौख्य यांसाठी ते जादू–टोणा, मंत्र–तंत्र, भूत–पिशाच्च, दैवी नैसर्गिक कोप, नैसर्गिक कृपा यांवर विश्वास ठेवून स्वच्छंदी जीवन जगत असतात.
समस्या अध्यायनाचे महत्व :-
‘कोरकु’ आदिवासी जमातीची नागरी समाजापेक्षा वेगळी असलेली संस्कृती, त्यांचा गौरवशाली इतिहास, निसर्गावलंबी जीवनसारणी इत्यादी घटकांचा बारकाईने अभ्यास करणे हा या अध्यायनाचा प्रमुख उद्देश आहे.
‘कोरकु’ आदिवासी स्त्रियांचे सांस्कृतिक जीवन, त्यांचे रीतीरिवाज, रुढी, प्रथा, परंपरा नेमक्या कोणत्या आहेत ! हे जाणून घेण्याच्या उद्देशाने प्रस्तुत अध्ययन करण्यात आले आहे.
अध्ययनाची उद्दिष्टे :-
१.
‘कोरकु’ आदिवासी महिलांच्या सांस्कृतिक न धार्मिक जीवनाचा अभ्यास करणे.
२.
‘कोरकु’ आदिवासी महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा आढावा घेणे.
गृहीतके :-
१.
‘कोरकु’ आदिवासी महिलांचे आर्थिक जीवन निकृष्ट दर्जाचे आहे, पण सांस्कृतिक जीवन मात्र वैभवसंपन्न आहे.
२.
‘कोरकु’ महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे.
३.
‘कोरकु’ आदिवासी महिला आर्थिकदृष्टया जरी मागासलेली असली तरी वैज्ञानिकदृष्टया ती कधीच मागास नव्हती, नाही आणि राहणारही नाही.
आदिम संस्कृती :-
आदिमता म्हणजे मानवी जीवनाची प्राचीनतम निसर्गाश्रयी जीवनावस्था होय. मानवी जीवनाची ही प्राचीनतम निसर्गाश्रयी जीवनावस्था अवशेषात्मकतेने आज ‘कोरकु’ आदिवासी’ म्हणविल्या जाणाऱ्या समाजात पहावयास मिळते. आदिम जीवनाच्या वैशिष्ट्यांसह ‘‘कोरकु’ आदिवासी जमातीतील बहुतांशी लोकजीवन हे वन्यपर्यावरणाशी, शेतीनिष्ठेचे व अतिव काबाडकष्टाचे असते. निसर्गावलंबी व कष्टमय जीवन यामुळे त्याच्या जीवनाला करुणा आणि समाधान या संवेदना अधिक चिकटलेल्या असतात. मानवाबरोबरच पशूपक्षी, प्राणी, वनस्पती यांच्यावर प्रेम करणे, त्यांच्याकडे समानतेच्रूा दृष्टिकोनातून पाहणे याचे बाळकडू ‘कोरकु’ आदिवासींना लहानपणापासूनच मिळालेले असते. त्यांच्या बालवयातच हे संस्कार बिंबवले जातात. त्यामुळे त्यांच्या मनाची जडणघडण अशीच झालेली दिसते. जंगल, प्राणी, वनस्पती आणि एकूणच पर्यावरण यांचे रक्षण कसे करायचे? हे ‘कोरकु’ आदिवासीना कोणी सांगण्याची गरज नाही. निसर्गावलंबी जीवनसरणी आजही ‘कोरकु’ आदिवासी जमातील घट्टपणे अस्तित्वात असलेली दिसते.
‘कोरकु’ आदिवासी महिलांची धार्मिक कल्पना :-
‘कोरकु’ आदिवासी महिलांच्या धर्मिक कल्पनांमध्ये प्रामुख्याने निसर्गपूजा आहे. प्रत्येक चराचर वस्तुमध्ये चैतन्य आहे, असे मानून त्या शक्तीची ह्या महिला पूजा करतात. नृत्यही याच शक्तीची देणगी असल्याने ‘अनाकलनीय’ शक्तींना प्रसन्न करण्याचे साधन म्हणून नृत्याकडे पाहतात. सर्व शक्तीमान निसर्गावरच जीवन अवलंबून असल्याने त्याला संतुष्ठ ठेवावे या भावनेने केली जाणारी पवित्र कृती म्हणजे नृत्य अशी ‘कोरकु’ आदिवासी महिलांची धारणा दिसून येते. ‘कोरकु’ आदिवासी महिलांच्या नृत्यसंकल्पनात चैतन्य आहे. निसर्गातील शक्ती आणि चैतन्य यांचा मिलाफ त्यात दिसून येतो. आई, मुलगी, नात अशा तीनही पिढ्या एकत्र उत्साहाने नाचतात‘कोरकु’ आदिवासी संस्कृतीच्या जडणघडणीत निसर्गाचा फार मोठा वाटा आहे. ‘कोरकु’ आदिवासी महिला जिथे वास्तव्य करतात त्या भागातील नैसर्गिक व सामाजिक वातावरण म्हणजे डोंगरदऱ्या, नदीताले, पशूपक्षी, वृक्षवेली, सणोत्सव, नाचगाणी, बाजार, जन्मप्रथा, विवाहप्रथा, मर्तिकप्रथा, जमातपंचायत जत्रायात्रा, लोकसमजुती, संकेत देव देवता, शेतीचे हंगाम या सगळ्यांचा ठसा ह्या ‘कोरकु’ आदिवासी महिलांच्या कलाजीवनावर (सांस्कृतिक जीवनावर) जाणवतो.
‘कोरकु’ आदिवासींचा गौरवशाली इतिहास :-
शुर–वीर ‘कोरकु’ आदिवासी स्त्री–पुरुषांच्या स्वतःने
लिहिल्या गेलेल्या इतिहासाची जी तेजस्वी पाने भारतीय इतिहासात अपेक्षित राहिलीत, त्यांची देखील आठवण करुन देणे गरजेचे वाटते. ज्यामध्ये अनेक आदिवासी स्त्री–पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामध्ये प्रामुख्याने क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा, रघुनाथ शहा, शंकर शहा, बाबुराव शेडमाके, कुमरा भिमू, श्यामा कोलाम आदी क्रांतीकारकींचे योगदान महत्वाचे आहे. या शिवाय आदिवासी स्त्रियाही यात मागे नव्हत्या. राणी दुर्गावती, झलकारीबाई, राणी हिराई, राणी पद्मावती, राणी सिनगीदयी, राजकुमारी वमेली अशा कितीतरी आदिवासी स्त्रियांनी रणभूमीवर आपले कर्तृत्व गाजविले.
‘कोरकु’ आदिवासींचा इतका उज्जवल, उदात्त, गौरवशाली, सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा दैदिप्यमान इतिहास आहे.
मातृसत्ताक समाज व्यवस्थेच्या वारसदार:
‘कोरकु’ आदिवासी महिला :-
‘कोरकु’ आदिवासीमध्ये स्त्रियांना पुरुषांपेक्षाही महत्वाचे स्थान आहे. ‘‘कोरकु’’ आदिवासी स्त्रिया ह्या मातृसत्ताक समाज व्यवस्थेच्या वारसदार आहेत. ‘कोरकु’ राज्यकर्त्या महिलांनी राज्याचा कारभार समर्थपणे सांभळलेला आहे. ब्रिटिशांविरुद्धच्या उठावामध्ये ‘कोरकु’ आदिवासी स्त्रियांच्या प्रामुख्याने सहभाग राहिलेला आहे. स्वातंत्र, समता, बंधूता, माणुसकी, सहकार्याची भावना, स्त्रियांना समान दर्जा या गोष्टी ‘कोरकु’ आदिवासी समाजात दिसून येतात म्हणूनच सांस्कृतिक दृष्टया मुख्य प्रवाह आदिवासींचा आहे.
जगाला आदर्शवत ठरणारी संस्कृती:-
‘कोरकु’ आदिवासी संस्कृती ही जगाला आदर्शवत ठरणारी आहे. कारण ‘कोरकु’ आदिवासीमध्ये:-
१. ‘कोरकु’ आदिवासी महिलांना आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र आहे.
‘कोरकु’ आदिवासींमध्ये हुंडाप्रथा नाही. याउलट मुलींनाच गोनम, वधूशुल्क, दिले जाते.
३ ‘कोरकु’ आदिवासींमध्ये आजही बऱ्याच अंशी मातृसत्ताक पद्धती आस्तित्वात आहे.
४ नवऱ्याशी पटत नसेल तर सहजपणे जमातीतील पंचायतीच्या साक्षीने काडीमोड (घटस्फोट) घेण्याचा आधिकारही ‘कोरकु’ आदिवासी महिलेला आहे.
५ स्त्रिभ्रुणहत्या ही समस्या ‘कोरकु’ आदिवासींमध्ये नाहीत.
६ ‘कोरकु’ आदिवासीमध्ये विधवा विवाह संमत आहे. स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रगत समाजात होणरी स्त्रियांची घुसमट इथे नाही.
‘कोरकु’ आदिवासी महिलांचे शिक्षणाचे प्रमाण :-
‘कोरकु’ आदिवासी स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. राजकारणात तर त्यांची वाटचाल अतिशय संथगतीने चालू आहे. हे आजचे वास्तव आहे. ‘कोरकु’ आदिवासी महिलांचा इतिहास पाहता महिलांनी स्वांतत्र्यासाठी लढताना आपल्या प्राणंची आहुती दिली आहे. आपल्या शौर्याने रणभूमी गाजवली आहे. समर्थपणे राज्यकारभार सांभाळला आहे आणि आपला हाच आदर्श समोर ठेवून ‘कोरकु’ आदिवासी स्त्रियांनी राजकारणात अधिकाधिक सक्षम होणे आवश्यक आहे.
‘कोरकु’ आदिवासी महिलांची आर्थिक स्थिती:-
‘कोरकु’ आदिवासी महिलांच्या उपजिविकेचे साधने शेती, मजुरी आणि जंगलकाम हेच प्रामुख्याने आहेत. शेती व्यवसाय करणाऱ्यात स्वत:च्या मालकीची शेती करणारे, कूळ म्हणून शेती करणारे आणि शेतमजूर दिसून येतात. शेतमजूरी करणाऱ्या काही महिला बिगर आदिवासीच्या शेतीवरही अवलंबून राहतात.
‘कोरकु’ आदिवासी महिलांच्या अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण:-
१)
शेती :- ‘कोरकु’ आदिवासी महिलांचा प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे. या शेतीमधून त्या खरीपाच्या हंगामामध्ये कापूस, ज्वारी, तूर, बाजरी, उडीद, मुग, चवळी ही पिके घेतात. त्यांची शेती करण्याची पद्धती पारंपारिक असल्यामुळे उत्पन्न म्हणावे तेवढे मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते किंवा अर्धपोटी जीवन जगावे लागते. परिणामत: ‘कोरकु’ आदिवासी महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याने दिसून येते.
२)
पशुपालन व कुकुटपालन :- मेळघाटमधील ‘कोरकु’ आदिवासी महिलांकडे थोड्याफार प्रमाणात पशूधन आहे. त्यात शेळ्या, बैल, कोंबड्या इत्यादींचा समावेश होतो. कोंबड्या व शेळ्या त्यांच्यासाठी आर्थिक प्राप्ती करुन देणारे महत्वाचे साधन आहेत. बहुतेक कुटुंब कोंबड्या व शेळ्या विकून आपल्या घरातील किरकोळ खर्च भागवितात. मोठ्या प्रमाणात अडचण आली तर गाय, बैल, यांची विक्री करुन आर्थिक प्रश्न सोडवतात.
शिफारशी :
1. ‘कोरकु’ आदिवासीच्या रुढी, परंपरा, प्रथाशी मेळ घालून नवीन कौशल्य प्रदान करणे; आणि त्यांच्या सर्वागीण विकासासाठी त्यांना स्वयंप्रेरित करुन विकास योजनाच्या कार्यात सहभागी करुन घेणे.
2. ‘कोरकु’ आदिवासी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्यात शिक्षणविषयक जागृती व प्रचार करणे आवश्यक आहे जेणेकरुन त्या शिक्षण घेवून मुख्य प्रवाहात येवू शकतील.
निष्कर्ष :-
1. ‘कोरकु’ आदिवासी महिलांचे आर्थिक जीवन निकृष्ट दर्जाचे आहे, पण सांस्कृतिक जीवन मात्र वैभवसंपन्न आहे.
2. ‘कोरकु’ आदिवासी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असून त्याचे कारण दैनंदिन घरकाम व शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा हे आहे.
3. ‘कोरकु’ आदिवासी महिला आर्थिकदृष्टया जरी मागासलेली असली तरी वैचारिक दृष्टया ती कधीच मागास नव्हती, नाही आणि राहणारही नाही.