Saturday, April 5, 2025
Homeविद्यार्थी हितHow to Join NDA (National Defence Academy)?

How to Join NDA (National Defence Academy)?

 How to Join NDA (National Defence Academy)

तयारी एन.डी.ए ची!!!

         देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.

         भारतीय संरक्षण दले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी” म्हणजेच “National Defence Academy (NDA) / एन.डी.ए.” च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन.डी.ए., खडकवासला, पूणे  येथे करवून घेतली जाते. 

पात्रता:-

शैक्षणिक पात्रता:-

         एन.डी.ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२वीत शिकत असावा अथवा १२वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे. 

वयोमर्यादा:-

         एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय – साडे सोळा ते साडे एकोणीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया:-

         एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.

प्रवेश परीक्षा:-

         एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते. 

सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत:-

         भारतीय सैन्यदलांत अधिकारी होऊ इच्छिणार्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलाखत ५ दिवस चालते. मुलाखत दोन टप्यांत घेतली जाते.

पहिला टप्पा:-

         या टप्यास स्क्रिनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसर्या टप्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात.

दुसरा टप्पा:-

         या टप्यात उमेदवारांच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क्स (Group  Tasks) व वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये दिलेल्या चित्रांवरून गोष्ट लिहिणे, दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करणे. दिलेल्या विविध परिस्थितींमधून मार्ग कसा काढणार हे लिहिणे तसेच स्वत:बद्दलचे मत लिहिणे या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. ग्रुप टास्क्स मध्ये विविध प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक चाचण्या घेतल्या जातात. यात उमेदवार विविध अडथळे एक संघ म्हणून कसे पार करतात हे पाहिले जाते. तसेच उमेदवार एक संघ नायक म्हणून कश्याप्रकारे काम करतो हे देखील पाहिले जाते. याच बरोबर येथे गट चर्चांचाही समावेश असतो. या सर्व गट चर्चा इंग्रजी मध्ये होतात. वैयक्तिक चाचण्यांमध्ये दिलेल्या विषयांमधील एका विषयावर तीन मिनिटे भाषण करणे, तसेच जमिनीवरचे विविध अडथळे तीन मिनिटात पार करणे अशा चाचण्यांचा समावेश असतो. हवाई दलात वैमानिक होऊ इच्छिणार्या उमेदवारांची Pilot Aptitude Battery Test  (PABT) ही आणखी एक चाचणी होते.

         मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील त्यांची पुढील काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एन.डी.ए च्या आर्मी, नौदल किंवा हवाई दल या शाखांत आपल्या आवडीनुसार आणि अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानानुसार प्रवेश दिला जातो.

एन.डी.ए. मधील प्रशिक्षण:-

         एन.डी.ए. मधील प्रशिक्षण कालावधी हा बी. एस. सी. तीन तर बी. ई. चार वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच खडतर शारीरिक व मिलिटरीचे प्रशिक्षणही पूर्ण करतात. एन.डी.ए. मधील बी. एस. सी. चा तीन वर्षांचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो तर बी. ई. 8 टर्म मध्ये. 

येथील प्रशिक्षणात ७०% भर अभ्यासावर तर ३०% भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो. येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध स्क्वाड्रन्स मधे विभागणी केली जाते. हे स्क्वाड्रन्स हेच पुढील तीन वर्ष या विद्यार्थ्यांचे घर असते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची नियमितपणे परेड, पोहणे, विविध खेळांची तयारी करवून घेतली जाते. या प्रशिक्षणात येथे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एका १२वी पास विद्यार्थ्यामधून भविष्यातील लष्करी अधिकार्यामधे रुपांतर केले जाते. एन.डी.ए. चे तीन / चार वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले कॅडेट्स आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले की आर्मी, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होतात. एन.डी.ए. च्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अधिकारी पदावर काम करत असतांना नेहमीच आपल्या देशाची व त्यांना घडविलेल्या प्रशिक्षण संस्थेची मान आणि शान उंचावली आहे. या संस्थेने आजवर देशाला दिलेल्या हजारो दर्जेदार अधिकार्यांपैकी अनेक अधिकार्यांना त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्या बद्दल विविध शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे पहिले अंतराळवीर स्क्वाड्रन्स लीडर राकेश शर्मा (अशोक चक्र) हे देखील एन.डी.ए. च्या ३५व्या तुकडीचे विद्यार्थी होते. १२वी नंतर करिअर करण्यासाठी एन.डी.ए. हा सर्वोत्तम पर्याय आहे.  

सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे:-

         एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. पैरा जंपींग, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायंबींग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते. 

सातव्या वेतन आयोगा नुसार दरमहा पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते, रहाण्यासाठी क्वार्टर्स, सी.एस.डी. कॅन्टिनची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भरपूर रजा, अभ्यासासाठी पगारी रजा, देश पातळीवर नावाजलेल्या मैनेजमेंट कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राखीव जागा इ. सुविधा मिळतात. येथील अधिकार्यांना जगातील नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळते. अतिप्रगत बंदुका, नौदलातील  लढाऊ जहाजे, पाणबुडी तसेच हेलीकॉप्टर व ध्वनिपेक्षाही वेगाने उडणारे लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे काम करण्याचे समाधान मिळते.

अर्ज कधी करावे:-

         जून मध्ये १२वी ला प्रवेश घेणारे तसेच १२वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यांची एन.डी.ए. प्रवेशासाठी परीक्षा दि. सप्टेंबर मध्ये घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली ११वीची किंवा १२वी ची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची अंतिम तयारी सुरु करायला हवी. यंदा १२वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए. साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा एप्रिल मध्ये घेण्यात येइल. या विद्याथ्यांना १२वी ची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी एन.डी.ए. च्या तयारीसाठी करावा.  


शालेय विद्यार्थ्यांसाठी:-

         सध्या शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढील मार्गांनी एन.डी.ए. मध्ये दाखल होऊ शकतात.

एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेण्यासाठी शासनाने विविध संस्थांची स्थापना केलेली आहे. या काही दर्जेदार शिक्षण देणार्या सर्वोत्तम संस्थापैकी काही संस्थांची थोडक्यात माहिती:

१. सैनिक स्कूल, सातारा:- ५वी व ८वी च्या विद्यार्थांसाठी:

        येथे विद्यार्थ्यांना इ. ६वी व ९वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येते. अर्ज करण्यासाठी इ. ५वी व ८वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. अधिक माहिती www.sainiksatara.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


२. राष्ट्रीय इंडीयन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून:- ६वी व ७वी च्या विद्यार्थांसाठी:-

         येथे विद्यार्थ्यांना इ. ८वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. अर्ज करण्यासाठी इ. ६वी व ७वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळेस, जून व डिसेंबर महिन्यात घेतली जाते. अधिक माहिती www.rimc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

३. सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट (SPI), औरंगाबाद: १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी:-

         या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना इ. ११वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे ११वी व १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी १०वीत शिकत असलेल्या मुलांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे मध्ये घेण्यात येईल. 

         अनेक पालकांची आपल्या पाल्याला एन.डी.ए. मध्ये पाठविण्याची इच्छा असते. परंतु योग्य मार्ग माहीत  नसल्यामुळे त्यांचे पाल्य एन.डी.ए. प्रवेशास मुकतात. बर्याच पालकांचा असा गैरसमज असतो की एन.डी.ए ला जाण्यासाठी घोडसवारी, रायफल शुटींग जमणे किंवा जिमला जाणे आवशक आहे. परंतु वरील माहिती वरून आपल्या लक्षात येईल की एन.डी.ए. च्या लेखी परीक्षेसाठी ११वी व १२वी च्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच मुलाखत उत्तीर्ण करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून एखादा सांघिक खेळ खेळून आपले नेतृत्व गुण विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी रोज थोडावेळ मैदानात जाऊन व्यायाम केला किंवा नियमितपणे मैदानात एखादा सांघिक खेळ खेळला तरीही असे विद्यार्थी एन.डी.ए. निवडी मधील सर्व शारीरिक चाचण्या पूर्ण करू शकतात. एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की एन.डी.ए. ला निवड झालेले बरेचशे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील तसेच कोणत्याही प्रकारची लष्करी पार्श्वभूमी नसलेली असतात. एन.डी.ए. मध्ये फक्त लष्करी अधिकार्यांचेच मुले सिलेक्ट होतात हा देखील एक गैरसमज अथवा न्यूनगंड आहे. गुगल वर थोडा शोध घेतला की लक्षात येईल की एका सर्वसाधारण रिक्षा चालकाचा मुलगा, शेतकर्याचा मुलगा, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, पोलिस हवालदाराचा मुलगा असे बिगर लष्करी पार्श्वभूमी असलेले असंख्य मुले एन.डी.ए. मध्ये दाखल होऊन आज लष्करात अधिकारी पदाच्या मोठ्या हुद्यावर आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घ्या, एन.डी.ए. ला जाण्याचे आपले ध्येय्य निश्चित करा आणि लागा तयारीला….👍

🇮🇳जयहिंद!! 👋👮🏼

@RudraTech

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!