बंधू-भगिनींनो क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या कृतीविचारांना न्याय देवुया.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्ताने हा लेख भारताचे महानायक महानायिका या पुस्तकातून .
सावित्रीमाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होय. त्यांना तीन भावंडे होती,त्यांची नावे सिधूजी सखाराम आणि श्रीपती होती. आपल्या भावंडासोबत मैत्रिणी सोबत हसत खेळत सावित्रीमाईंचे बालपण गेले. शेतावर जाणे, चिंचा पाडणे, झाडावर चढणे,विहिरीत पोहणे, घरकामात आईला मदत करणे.अशातच 10 वर्षे वय असताना क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि राष्ट्रपिता जोतिराव फुले यांचा 1840 ला नायगाव येथे विवाह झाला.त्यावेळी महात्मा जोतिराव 13 वर्षांचे होते.
(1)सामाजिक जबाबदारी :-
आधुनिक भारतात सामाजिक परिवर्तन घडवून आणले त्या जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या कृतीविचारापासून आजचे “सर्व लाभार्थी” त्याच विचाराची प्रतारणा तर करीत नाहीत ना!
या क्रांतिकारक सामाजिक व्यवस्था परिवर्तन घडवून आणणाऱ्या आई-वडिलांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ आवश्यक आहे, परंतु आजही मनुवादी व्यवस्था ते करत नाहीत, करणार नाहीत ! मात्र मनुवादी आपल्या लोकांसाठी नियमात बदल करून पुरस्कृत करतात! आम्ही वारस म्हणून कृतघ्न झालो आहोत काय हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारावा लागेल ! कारण ज्या फुले आई- वडीलामुळे हे सर्व आम्हांला मिळाले त्यांच्याच मार्गदर्शक कृतीविचारापासून आम्ही दूर गेलो आहोत.
एक प्रसंग आहे,
डॉक्टर यशवंतची बायको शेवटच्या वारस चंद्रभागा आणि तिची मुलगी सोनाबाई होत.यांना शेवटच्या दिवसात खायला अन्न मिळाले नाही,अन्नासाठी घर विकावे लागले. ऐतिहासिक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पुस्तके रद्दीत विकून अन्न मिळवले. शेवटी काहीच शिल्लक न राहिल्याने उपासमार होऊन त्यातच तिचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार साठी कुणीही पुढे आले नाही. त्यावेळी पुणे पालिकेने बेवारस म्हणून त्यांचा अंत्यसंस्कार केला. ज्यांच्यामुळे आमचा संसार सुखी झाला.ज्यांचा वारसा म्हणून आम्ही गाडी,माडी, साडी मिळाली.
आजही आम्ही पुण्याला जातो फिरतो पण गंज पेठेतील फुलेवाडा येथे जात नाहीत! तिथे आता नियमितपणे गेले पाहिजे.
ज्या भिडेवाड्या पासून क्रांतीची प्रेरणा मिळाली तो भिडेवाडा जाणीवपूर्वक नष्ट केला जातांना आम्ही उघडे डोळे ठेवून ‘मूकपणे’ पाहत आहोत.अनेकांना तर तो कुठे आहे हेच माहीत नाही! मात्र ‘दगडूशेठ हलवाई चा गणपती’ मार्केटिंग मुळे पुढेच आहे!
आमच्या उच्चशिक्षित वनस्पतीशास्त्रात पी.एच.डी.असणाऱ्या, महिलेला वडसावित्री पौर्णिमा व्रत करतात. खरंच आम्हांला विज्ञान समजले की आम्ही पोपटपंची करत आहोत.
सर्व व्रतवैकल्ये,कर्मकांड, निरंकार उपवास,अनेक उघड्या -नागड्या बाबांचे, ढोंगीसाधूंचे,
बापू,कापू,अम्मा यांचे सत्संग आणि आश्रमाची ‘सेवा ‘
तन-मन-धनाने केली जाते आहे. यात अनेक स्त्रिया पार बुडून गेल्या आहेत.त्यांचे हक्क अधिकार विसरून गुलामगिरीत त्या जगत आहेत. त्यांना गुलाम बनविणाऱ्या टी.व्ही. चॅनलवरील नवरा-बायको, सासू-सून सह कुटुंबातील लफडे,विसंवाद असणाऱ्या मालिका सवड काढून पाहिल्या जातात!
मुलांचा अभ्यास घ्यावा ! ती पुस्तके वाचून उत्तरे घ्यावीत. या मात्र प्रचंड कष्टत ज्या सवित्रीमाईनी वारसा दिला तिचे कार्य,कर्तृत्व आणि वारसा सांगता ही येत नाही. अनेक बंगल्यात,घरात त्या माऊलीचा एक साधा फोटॊ,पुस्तकं ही नाही! ही शोकांतिका,कृतघ्नता आहे, असे वाटते!
आजच्या दिवशी कृतीविचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी सुरुवात करूया संदेशपर असणारे उपलब्ध साहित्य
‘काव्यफुलें,पत्रे, ‘गुलामगिरी,अखंड, शेतकऱ्यांचा आसूड, पोवाडे, ब्राह्मणाचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीयरत्न,उइलपत्र सह इतरही पुस्तके उघड्या डोळ्यांनी आणि जिवंत मेंदूनी वाचून अंगीकार करूया.याच बरोबर विचाराचे वारस म्हणून आपला वेळ,बुद्धी, श्रम आणि पैसा बहुजन समाजासाठी खर्च करूया.
या सामाजिक क्रांतिकारक महामानवांनी जी व्यवस्था परिवर्तन घडवून आणले. त्या व्यवस्थेत दुश्मनी शक्तींनी भेसळ करून ती दूषित करण्यास सुरुवात केलेली आहे आणि ते पुन्हा ‘मनुस्मृति’ लागू करण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रसिद्ध विचारवंत जोसेफ मॅझीनी म्हणतो,
You Can Kill a Great Person but you cannot kill his Great ‘Idea’.
“तुम्ही व्यक्तीला मारू शकतात परंतु त्याचे विचार मारू शकत नाहीत.”
परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी याबाबत अधिक पुढे जावून विश्लेषण करतांना
“तुम्ही व्यक्तीला मारू शकता आणि त्याच्या विचारात ‘भेसळ’करून त्यांना ही संपवू शकता”.–
कारण त्या महापुरुषांच्या विचाराचे अनुयायी जर सक्षम नसतील, ते त्यांच्या स्वतःच्या साडी,माडी आणि गाडी यात दंग असतील. हेच होत आहे.
एक प्रसंग आहे,त्यात सावित्रीमाई जोतीराव फुले यांना शेवटच्या दिवसात सामाजिक काळजी म्हणून प्रश्न विचारतात की,तात्यासाहेब तुमच्या नंतर या समाजाचे कसे होईल?
त्यावर राष्ट्रपिता जोतीराव फुले उत्तर देतात ,
“सावित्री माझ्या शरीरात असलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून बहुजनांच्या घराघरात महात्मा फुले जन्म घेतील!”
काय आमच्या घरात असे झाले आहे काय!तात्यासाहेब फुलेंचा विश्वास आम्ही तोडला आहे,असे वाटते. चला आता नव्याने सुरुवात करून तात्यासाहेब म फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कृतीविचारांना पुढे नेवूया.
(2)देशातील पहिली शिक्षिका :-
सगुणाबाई क्षीरसागर या जोतीराव फुले यांच्या मावसबहिन होत्या.त्यांनी जोतीराव आणि सावित्रीमाई यांना शिक्षणासाठी आणि इतरही खूप मदत केली. त्यांच्या सोबतीने राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी सावित्रीमाई यांना स्वतः शिकवले.1847 ला नॉर्मल स्कुलच्या मिचेल बाईंनी दोघीची परीक्षा घेतली होती आणि प्रगतीचे कौतुक केले होते. 1जानेवारी 1848 ला भारत देशातील क्रांतिकारक घटना घडली ती म्हणजे मुलींची पहिली शाळा जोतीराव फुले यांनी सुरू केली होती.कारण शिक्षणामुळे मती,नीती, गती,वित्त आणि दर्जा यात सुधारणा होते.यासाठी सावित्रीमाई यांनी मुलीच्या शाळेत विनावेतन शिक्षिका म्हणून काम केले!जे करतांना खूप त्रास,अपमान सहन केला.यात सनातनी ब्राह्मण मंडळीनी प्रचंड त्रास दिला. शाळेला जात असताना खडे फेकून मारणे,शिव्या देणे, शेणाचे गोळे मारणे,धमक्या देणे, सुपारी देवून मारेकरी पाठविणे.मुली शिकल्या तर अन्नात किडे पडतात असे सांगणे,सर्व मुलींना,शूद्रांना शिक्षण देणे हा धर्मद्रोह आहे असे सांगणे.एकदा तर भर रस्त्यात एकाने शाळा बंद करतेस की अब्रू घेऊ इथपर्यंत मजल मारली.पण धाडस करून सावित्रीमाई ने त्याच्या कानशिलात लगावली आणि प्रसंग सोडवला.सर्व स्त्रिया आणि बहुजनांच्या शिक्षणाचे काम हे थांबवत नाहीत म्हणून सनातनी भटांनी जोतीराव फुलेंचे वडील गोविंदराव यांना धमकाविले. ज्यामुळे त्यांनी जोतीराव आणि सावित्रीमाई यांना हे काम थांबवा नाहीतर माझे घर सोडून द्यावे !
आणि
शेवटी घर सोडले पण बहुजनांच्या उद्धाराकरिताचे काम सोडले नाही.
याचबरोबर सावित्रीमाई यांनी फातिमा शेख यांनाही सोबत घेऊन शिक्षिका बनवले .आज ज्या महिला आणि मुली शिक्षण घेऊन प्रगतीच्या शिखरावर पोहचल्या आहेत,त्याची पायाभरणी आणि इमारत उभी करण्याचे महानकार्य हे या आई- वडिलांनी केले आहे.
(3)सार्वजनिक तिळगूळ समारंभ:-
समता प्रस्थापित करण्यासाठी 14 जानेवारी1852 ला हा समारंभ घडविला,अध्यक्षा म्हणून पुणे कलेक्टरची पत्नी मिसेस जोन्स होत्या .त्या कार्यक्रमाचा बोर्ड असा होता, “आपल्या लेकी,सुना यांना घेऊन यावे.समारंभ संध्याकाळी 5 वाजता आहे. कोणत्याही जाती धर्माच्या बायका आल्यातरी एकाच जाजमावर बसतील. जातिभेद व पक्षपात न करता सर्वांना सारखेच धरून हळदीकुंकु लावण्यात आणि तिळगूळ वाटण्यात येईल.”
(एक पोते तीळ आणि दोन ढेप गुळ लागला होता.)
आजच्या आमच्या बहिणी वाट्या,चमचे,बो,काटे ,पिना गोळा करण्यासाठी फिरत आहेत.
तसेच अनेक ठिकाणी यात सावित्री, जिजाऊ, अहिल्या, रमाई सह महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकें वाचन देवाण घेवाण ही होत आहे.अनेक विधायक कार्यक्रम महिला मंडळ आयोजित करीत आहेत.
4)आद्यसाहित्यिक, कवियत्री:-
सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वास्तव वेदना शब्दांत मांडल्या.विषमता समूळ नष्ट करण्यासाठीचे हे साहित्य होत. क्रांतिकारक सावित्रीमाई आद्य कवियत्री आहेत कारण 1854 ला “काव्यफुले” हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे.केशवसुत यांच्या 35 वर्षे अगोदर, केशवसुतांचा जन्म 1866 चा आणि काव्यलेखन 1885 पासून चे!….
सावित्रीमाई काव्यफुले तील
‘शूद्रांचे परावलंबन’या कवितेत म्हणतात –
शूद्र आणि अतिशूद्र। अज्ञानाने पछाडले।
देव धर्म रूढी अर्ची ।दारिद्रयाने गळाले।
ज्ञानाची नसती डोळे।
म्हणोनि न दिसे दुःख ।स्वावलंबी नसे शूद्र।स्वीकारती पशु सुख।।
किंवा
“इंग्रजी शिका” या कवितेत –
शूद्र अतिशूद्र।दुःख निवाराया
इंग्रजी शिकाया।संधी आली। इंग्रजी शिकूनी।
जातिभेद मोडा।
भटजी भारुडा फेकुनिया।।
याचबरोबर सावीत्रीमाईंचा ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.
लेखन:-
वैचारिक आणि सामाजिक विषयावर त्यांनी वाळवेकर यांच्या ‘गृहिणी’या मासिकात जातीभेदनिर्मूलन,स्त्रीशिक्षणाचेे महत्त्व,शुद्रअतिशूद्राकरिता शिक्षण,विधवाविवाह, बालहत्या ,बालविवाह इत्यादी ज्वलंत वेदनेवर लिहिले आणि जागृती केली.आमचे आजचे अनेक लेखक,कवी मनरंजनासाठी लिहतात.
पत्रलेखन:-
सावित्रीमाई यांनी अनेक प्रासंगिक पत्रे लिहली आहेत.10ऑक्टोबर1856ला शिक्षण विषयक विचार व्यक्त केलेले आहेत,ज्यात वडीलबंधु ला विद्याहीनता म्हणजे पशुत्वाची खूण आहे, याबाबत समजाविल्याचा उल्लेख आहे.
29 ऑगस्ट 1868 चे नायगाव येथुनचे पत्र,
20 एप्रिल 1877 चे जुन्नर येथून दुष्काळाची भयानकता दाखविणारेे पत्र आहे.
तर गणेश आणि सारजा यांना बचाव करून पाठविल्यानंतर सोबत दिलेले पत्र आहे.ही पत्रे आम्ही वाचून समजून घेतली तरच खऱ्या अर्थाने आम्ही त्यांच्या विचारांचे वारस आहोत हे सिद्ध होईल.
त्यामुळे हे साहित्य उपलब्ध आहे,फक्त आपण ते वाचण्याची इच्छा करा..
संपादन:-सावित्रीमाई यांनी जोतीराव फुले यांच्या भाषणांचा सारांश 25 डिसेंबर 1856 ला संकलित करून चार भागात प्रसिध्द केली.त्यांची शीर्षके१.अतिप्राचीन काळी,
२.इतिहास,
३.सुधारणूक आणि ४.गुलामगिरी
अशी आहेत.
(4)बालहत्या प्रतिबंधकगृह :-
एके दिवशी लकडी पुलावरून जोतीराव फुले जात असताना कठड्यावरून नदीत उडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या काशीबाई नातू या विधवा वासनेची शिकार झालेल्या गरोदर ब्राह्मण स्त्रीला जीव वाचवून,समजूत घालून तिला घरी घेऊन येतात.सावित्रीमाई तिला आधार देऊन समजावून सांगतात तिचे बाळंतपण करतात.तिच्या त्या बाळाला यशवंत नाव देऊन दत्तक घेतात.वाट चुकलेल्या बालविधवा यांचे हाल होऊ नये
म्हणून 28 जानेवारी 1863 ला बालहत्या प्रतिबंधकगृह ची स्थापना केली. माणूस म्हणून जगता यावे.मानवता हाच खरा धर्म आहे.देशातील ही सर्वात क्रांतिकारक घटना होती.
(5)अनाथ बालबालीकाश्रम:-
काशीबाई प्रकरणं नंतर अनाथ आणि अशाच प्रकारच्या बाल-बलिकासाठी ज्यांचा सांभाळ जन्मदाते करत नाहीत,त्यांच्यासाठी अनाथ बाल बालिकाश्रम 1नोव्हेंबर1857 ला सुरू केल्याची नोंद 4 डिसेंबर 1884 च्या ऍक्टींग अंडर सेक्रेटरी मुंबई सरकार केलेल्या निवेदनात आहे.या अनाथ बाल बालिका कडे सावित्रीमाई जातीने लक्ष घालून सांभाळ करीत असत.
(5)सत्यशोधिका:-
सत्यशोधक समाजाचे काम प्रभावीपणे माईंनी नेतृत्व करून पुढे नेले. ‘सार्वजनिक सत्यधर्म’हे जोतीराव फुले यांचे लिखित पुस्तकं प्रसिद्ध केले. केशवपन ही अघोरीप्रथा बंद करण्यासाठी न्हावी लोकांचा संप घडवून आणला.ती प्रथा बंद केली. राधा ग्यानोबा निंबनकर आणि सीताराम जबाजी आल्हाट यांचा पहिला बिनाभटजी आणि विनाकर्मकांड ‘सत्यशोधक पध्दतीने’विवाह घडविला. पुढे डॉ.यशवंत आणि राधाबाई ससाणे यांचा ही सत्यशोधक विवाह लावला.पुढे अनेक विवाह या पद्धतीने लावले.1876 -77 च्या दुष्काळात लोकांची उपासमार होऊ लागली म्हणून अन्नछत्र चालू केले. राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी सतत हयातभर प्रचंड कार्य केले.अशातच त्यांना अर्धांगवायू चा झटका आला. त्यात उजवा हात आणि पाय यांनी योग्यपणे काम करता येत नव्हते.परंतु सर्व समाजाच्या उन्नतीसाठी , सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते,अनुयायी यांच्या मार्गदर्शनासाठी डाव्या हाताने लिहून 1889 ला सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ पूर्ण केला. 28 नोव्हेंबर 1890 साली रात्री 2 वाजून 20 मिनीटांनी वयाच्या 63 व्या वर्षी जोतीरावानी जगाचा निरोप घेतला.या दुःखातून सावरून क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी क्रांतिकार्याची ज्योत तेवत ठेवली.कारण जोतीराव यांच्या मृत्यूपत्रानुसार वारस डॉ.यशवंतला भावकीची लोकं तिरडी धरणे किंवा अंत्यसंस्कार यासाठी विरोध करीत होती,त्यावेळी स्वतः सावित्रीमाई पुढे आल्या आणि स्वतः तिरडी धरली, अंत्यसंस्कार केले.ही भारतातील एक क्रांतिकारी आणि पहिली घटना होती.
(6)प्लेगची साथ :-
1896च्या दुष्काळातून लोक सावरत असतानाच 1897 पुण्यात प्लेग ने हाहाकार माजवला. अनेक लोक प्लेग ने मृत्युमुखी पडत होते.अशा परिस्थितीत सावित्रीमाईनी डॉक्टर यशवंत ला नोकरीवरून सुट्टी काढून बोलावून घेऊन ‘उपचारकॅम्प’ सुरू केला.त्या स्वतः ही घराघरात,झोपडी-झोपडीतून लोकांना आधार देत होत्या. रोग्यांची शुश्रूषा करत होत्या. अशातच मुंढवा गावच्या पांडुरंग बाबाजी गायकवाड या प्लेगची लागण झालेल्या मुलाला स्वतः पाठीवर उचलून दवाखान्यात घेऊन आल्या.त्यातच त्यांनाही त्याचा संसर्ग होऊन प्लेगची लागण झाली.अशातच 10 मार्च1897 ला रात्री 9 वाजता क्रांतीज्योती सावित्रीमाईची प्राणज्योत मालवली.
@RudraTech