शिक्षिकेने बैलगाडीतून मिरवणूक काढल्याने भारावले चिमुकले
पारध खुर्द शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
बालचमूंची स्वारी चक्क सजवलेल्या बैलगाडीतून
जालना- पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांची स्वारी शनिवारी सजवलेल्या बैलगाडीतून वाजतगाजत गावातून मिरवणूक काढत शाळेत दाखल झाली. शाळा प्रवेशाचा आयुष्यातील पहिला दिवस चिमुकल्यांच्या स्मरणात रहावा, म्हणून शिक्षिका श्रीमती के. एस. वैद्य यांनी स्वतः बैलगाडी चालवली. यामुळे चिमुकले भारावून गेले होते.
भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द केंद्र-पिंपळगाव रेणूकाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला.
हा प्रवेशोत्सव सोहळा सरपंच अण्णासाहेब लक्कस, उपसरपंच भागवत लक्कस, व्यवस्थापन समिती अध्यक्ष भरत लक्कस, उपाध्यक्ष प्रभाकर पवार, मुख्याध्यापक एस.यू.जंजाळ यांनी सहकारी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीच्या साहाय्याने तो संस्मरणीय बनवला. शाळेच्या या नवउपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुकही केले. या प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी केंद्रप्रमुख श्री.एम.बि.लोखंडे, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.डी.एस. शहागडकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षण विभागाने पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कुणी ओवाळून, कुणी गुलाबपुष्प देऊन, कुणी गोडधोड देऊन नवागतांचे स्वागत केले.
पारध खुर्द शाळेच्या वतीने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ओवाळून, गुलाबपुष्प व गोडधोड देऊन स्वागत केलेच; शिवाय शाळेचा पहिला दिवस आयुष्यभर लक्षात रहावा, म्हणून पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली. गावात मिरवणूक काढून मग त्यांना शाळेत दाखल करून घेतले.
यावेळी शिक्षिका वैद्य यांनी स्वतः सारथी होत बैलगाडी चालवली.
शाळेत जायचे म्हणून किंवा आईबाबांना सोडून वेगळे व्हायचे, म्हणून एरवी रडकुंडीला येणारी मुले शिक्षिका बैलगाडी चालवत असल्याने आज खुशीत होती. त्यांच्या शाळा प्रवेशाचा उत्सव आणि त्यातून मिळणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. दुचाकी, रिक्षा अथवा मोठ्या गाडीतून मुलांना शाळेत सोडले जाते. पण पहिल्याच दिवशी त्यांना बैलगाडीत बसून शाळेत नेल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. याप्रसंगी शिक्षक श्री.डी. टी. अपार, श्री. जी. एच.उबरहंडे, श्रीमती.के.एस.वैद्य,श्री.एम.आर.गनगणे, अंगणवाडीताई, ग्रामस्थ, महिला मंडळ उपस्थित होते.