आता अंगणवाडीतील चिमुकल्यांना मिळणार इंग्रजीचे धडे
असा उपक्रम राबवणारा अमरावती हा पहिला जिल्हा
अमरावती : अंगणवाडीतील बालकांना आनंददायी शिक्षण मिळावं, बालकांच्या मनातील इंग्रजी विषयांची भीती कमी व्हावी तसेच इंग्रजी विषयात त्यांना बालपणापासूनच आवड निर्माण व्हावी आणि पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे वाढता कौल लक्षात घेता त्यांच्या अपेक्षाही पूर्ण व्हाव्यात यासाठी आता जिल्ह्यातील २ हजार ५९२ अंगणवाडी केंद्रातील ६६ हजार ३६३ चिमुकल्यांना इंग्रजी शिक्षण शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
महिला व बालकल्याण विभागाच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा श्रीगणेशा शिराळा येथील अमरावती) केंद्रात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
इंग्रजी शिक्षण ही आता काळाची गरज बनली आहे. इंग्रजी ही रोजच्या बोलण्यातील भाषा होत आहे. जास्तीत ज्ञान आजही इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी ही संवादाची, व्यापारांची आणि आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे या पिढीतील बालके इंग्रजी विषयात कुठेही कमी पडू नये किंवा इंग्रजी विषयाबद्दल त्यांच्या मनात भीती असू नये हा उद्देश समोर ठेवून राबविला जात आहे. या उपक्रमात दर महिन्यात दोन कविता, काही परिचित शब्द, काही क्रियात्मक शब्द, तीन अल्फाबेट आणि दोन अंक असा अभ्यासक्रम अंगणवाडी सेविकांसाठी तयार केला आहे. यासाठी सर्व पर्यवेक्षिकांना, अंगणवाडी सेविकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात हा अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावरून सनियंत्रण ठेवले जाणार आहे.