शिक्षकांचे माफीनामे घेतले; वसुलीचे काय?
बदलीसाठी बोगसगिरी : दिव्यांग गुरुजी चर्चेत
दिव्यांग प्रमाणपत्रामुळे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आल्यानंतर बीड जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रकरणाचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. बदलीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांनी दिव्यांगत्त्वाच्या जादा टक्केवारीचे प्रमाणपत्र सादर करून बोगसगिरी केल्याचे दोन वर्षांपूर्वी उघड झाले होते. त्यावेळी ७६ शिक्षकांना निलंबित केले होते. नंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार या शिक्षकांचे माफीनामे घेण्यात आले. परंतु, संबंधित शिक्षकांनी उचललेला सवलतींचा लाभ समान तीन हप्त्यांमध्ये वसूल करण्याची कार्यवाही मात्र आजपर्यंत ठप्प आहे. पुनर्तपासणीमध्ये तफावत आढळलेल्या शिक्षकांना निलंबित केले होते. त्याला काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने या शिक्षकांचे निलंबन रद्द करून त्यांच्याकडून माफीनामे घेण्याचे, तसेच शासन सवलतींचा घेतलेला लाभ समान तीन हप्त्यांत परत करण्याचे आदेश दिले होते.