आता ओवाळणी करून लाडक्या बहिणींची नोंदणी
जिल्हापरिषदेचा अनोखा उपक्रम : सीईओंनी दिल्या सूचना
अमरावती:सध्या सर्वत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरू असून जिल्हापरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने नोंदणीसाठी येणाऱ्या महिलांना ओवाळून त्यांची नोंदणी करण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये या योजनेने चांगलाच जोर धरला असून आजपर्यंत जवळपास ६० हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत.
प्रामुख्याने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर समूह साधन व्यक्ती, पर्यवेक्षिका, ग्रामपंचायतचा डेटाएन्ट्री ऑपरेटर, ग्रामसेवक यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून या योजनेला आणखी उत्तम प्रतिसाद मिळावा म्हणून महिला बाल विकास विभागामार्फत नाव नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या काही महिलांची आता प्रातिनिधीक स्वरूपात ओवाळणी करून नोंदणी करण्यात यावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी यंत्रणेला दिली आहे.
लाभार्थ्यांनी कोणत्याही केंद्रावर गर्दी न करता आवश्यक प्रमाणपत्र घेऊन संबंधित यंत्रणाकडे आपला अर्ज नोंदविला जाईल. त्यामुळे कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी केले आहे.