‘सेट’च्या निकालाबाबत अद्याप अस्पष्टता
परीक्षा दिलेले उमेदवार चिंतेत, सरकार गंभीर आहे का?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभागातर्फे राज्य पात्रता परीक्षेचे (सेट) दि. ७ एप्रिलला आयोजन केले होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून परीक्षेचा निकाल रखडल्याने परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या एसईबीसी आरक्षणांचा अंतर्भाव करून निकाल जाहीर करावा का? याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करूनही राज्य शासनाकडून उत्तर मिळत नसल्याने निकालास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.
सावित्रीबाई विद्यापीठाच्या राज्य पात्रता परीक्षा विभागातर्फे ३९ वी सेट परीक्षेचे दि. ७ एप्रिल रोजी महाराष्ट्र आणि गोव्यातील १७ शहरातील २८९ परीक्षा केंद्रावर आयोजन केले होते.
यंदा तब्बल १ लाख ९ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल फुले पुणे तयार करण्याचे काम सेट परीक्षा विभागाकडून पूर्ण झाले आहे. मात्र, सेट परीक्षेसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे का? राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेण्यात येत आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनातर्फे राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे गुरूवार दि. ४ जुलै रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.