पहिल्या वर्गातील चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने गेला जीव
स्वच्छतागृहात दुर्घटना : गावकऱ्यांचे रुग्णालयासमोरच ठिय्या
लाखांदूर (जि. भंडारा) : पहिल्या वर्गात मोठ्या उत्साहाने तिने पाऊल ठेवले; पण सत्राच्या तिसऱ्या दिवशीच शाळेच्या गलथानपणामुळे तिचा जीव गेला. स्वच्छतागृहात पडून असलेल्या ॲल्युमिनियम क्वॉईल्ड वायरच्या स्पर्शामुळे विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला. यशस्वी सोपान राऊत (६ वर्षे), असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ही घटना बुधवारी (दि. ३) सकाळी १०च्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पुयार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली.अन्य विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेल्या असता त्यांना यशस्वी पडलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
गावकऱ्यांची गर्दी आणि आक्रोश पाहता गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. यशस्वीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यावर गावकऱ्यांनी रुग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन केले.