मेळघाटात दुर्गम भागात दीडशे कंत्राटी शिक्षक देणार आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
जिल्ह्यातील मेळघाट या पेसा क्षेत्रातील शिक्षण भरतीची प्रक्रिया विविध कारणांमुळे रखडली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता राज्य शासनाने नवीन भरती होईपर्यंत या शाळांवर सेवानिवृत्त, तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सीईओ संजीता महापात्र यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांच्या उपस्थितीत ही भरती राबविण्यात आली. यानुसार मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळेत रिक्त असलेल्या ३०० जागांपैकी १४९ कंत्राटी शिक्षक नियुक्त केले आहेत. सदर शिक्षकांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार आहेत.
न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे राज्यातील आदिवासी (पेसा) क्षेत्रातील तब्बल १३ जिल्ह्यांतील शिक्षक भरती
रखडली आहे. शिक्षण विभागाने यावर कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढत अर्ज मागविले होते. त्यानुसार अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे ५५० निवृत्त शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये पहिल्या ११ सेवानिवृत्त शिक्षण नियुक्त केले आहेत. दुसऱ्या टप्यात पेसा क्षेत्रातील ६३ आणि तिसऱ्या
टप्प्यात सर्वसाधारण भागातील ५३ शिक्षकांना नियुक्ती दिली आहे. मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या ३०८ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर आतापर्यंत शासनाच्या निर्देशाप्रमाणे १४९ शिक्षक कंत्राटी शिक्षक पदासाठी नियमानुसार पात्र ठरले आहेत. त्यानुसार या सर्व शिक्षकांनी मेळघाटातील शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेवर नवीन शिक्षण भरती होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. या कंत्राटी शिक्षक भरतीनंतरही मेळघाटातील १५९ जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता रिक्त पदासाठी पुढील मार्गदर्शनाची प्रतिक्षा आहे.