कवितेतलं बावनकशी सोनं
कवितेच्या क्षेत्रात आपल्या प्रतिभेने स्वतंत्र स्थान मिळविणाऱ्या खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांनी तीन डिसेंबर १९५१ रोजी इहलोकाचा निरोप घेतला. त्याच्या स्मृतिदिनानिमित्त कवितेच्या प्रांतातील त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण…
“अहो, हे बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हाआहे,” हे उद्गार आहेत आचार्य अत्रे यांचे. सोपानदेवांनी आईच्या निधनानंतर सापडलेले कवितांचे बाड त्यांनी आचार्य अत्रे यांच्याकडे नेले. त्या कवितांवर बहिणाबाई चौधरी नजर टाकताच आचार्य अत्रे भावनावश झाले. त्यानंतर १९५२ मध्ये लेखन जेव्हा प्रसिद्ध झाले तेव्हा महाराष्ट्राला काव्यरूपी मोहरांचा जणू प्रशांत महासागर मिळाला.
ज्या कालखंडात मराठी सारस्वतातील दिग्गज कवी आपली प्रतिभा महाराष्ट्रावर उधळत होते, त्या काळात उत्तर महाराष्ट्रात एका खानदेशी कुटुंबात काळाशार भूमीत अंकुरासारख्या बहिणाबाई रुजल्या आणि वाढल्या. त्या भूमीची त्यांनी गाणी गायली. पाटी पुस्तक शाळा तर दूरच; पण अक्षराचाही गंध नसलेल्या त्या स्त्रीने मौलिक आणि आशयघन असा काव्यरूपातील समुद्रच महाराष्ट्राला बहाल केला. मानवी जीवनाचे तत्वज्ञान या अडाणी माऊलीने आपल्या साध्या, सोप्या पण रसाळ भाषेत सांगितले आणि समस्त बुद्धिवाद्यांना चकित केले. अशी ही लोकमाता, खानदेश कन्या म्हणजे बहिणाबाई चौधरी.
बहिणाबाई चौधरी खरंतर एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या. गाणं त्यांची जणू सहज प्रवृत्ती होती. आपण जे गीत गातो त्यास कविता म्हणता येईल की नाही, याची जाणीवही कदाचित त्यांना नसावी. Poets are born not made ही उक्ती बहिणाबाईंचे काव्य वाचताना सार्थ वाटते. त्या ‘लेवा गणबोली’ या भाषेत लिहायच्या. त्या अशिक्षित होत्या, पण त्यांच्याकडे काव्यात्मक जीवनाची प्रतिभा होती. बहिणाबाईंच्या कविता विशेषतः पिहार, जग, कृषिजीवन, पोळा, गुढीपाडवा इत्यादी विषयांवर आहेत. संकटांना दूर सारताना स्वतःच्या मनाला कशाप्रकारे खंबीर करावे हे बहिणाबाईंच्या लिखाणातून दिसून येते. कर्जबाजारीपणा, दुष्काळ इत्यादि मुले शेतकऱ्यांचे होणारे हाल त्यांनी केवळ पाहिले नाही तर ते त्यांच्या काव्यामध्ये उतरले. हे सर्व आपसूक घडत गेले. बहिणाबाई एका कवितेत म्हणतात, “अरे पांडुरंगा तुझी कशी भक्ती करू सांग तुझ्या रूपाआड येतं सावकाराचं रे सोंग.”
कवितांची आद्य प्रेरणा
बहिणाबाईच्या संघर्षातही सकारात्मक पैलू जाणवतो. तळागाळातील माणसांच्या दुःखाच्या वेदनांचा वेध त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. परमेश्वरावर त्यांची डोळस श्रद्धा आहे. पण त्यापेक्षा अधिक विश्वास आपल्या कर्तृत्वावर ठेवतात. “माझी माय सरसोती, माले शिकवते बोली.” असे सांगणाऱ्या बहिणाबाईंनी जीवनाच्या तत्त्वज्ञानाची उकल करून गुपिते काव्यातून उघड करून अनमोल असा ठेवा जगाला दिला. मनुष्य हा पृथ्वीवरचा सर्वात हुशार, बुद्धिमान प्राणी. त्याला बोलता, वाचता आणि महत्त्वाचे म्हणजे विचारही करता येतो. इतके असूनही अनेकजण आपल्या जबाबदा-यांपासून दूर पळतात. एक सुगरण पक्ष्याचे उदाहरण घेऊन किती सुंदर विचार बहिणाबाई मांडतात, “अरे खोप्या मंदि खोपा सुगरणीचा चांगला । देव पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला । तिची उत्लुशीच चोचं, तेच दात तेच ओठ । तुले देले रे देवाने, दोन हात दहा बोटं.”
बहिणाबाई एका कवितेत म्हणतात, “अरे मानसा मानसा कधि व्हशील मानूस, लोभासाठी झाला मानसाचं रे कानूस” आयुष्य जगात असतांना तुम्ही कसं जगायला हवे आणि तुम्ही कसे असायला हवे यावर किती सरळ विचार मांडले आहेत. बहिणाबाईच्या कवितांतून आपल्याला निसर्ग भेटतो, नात्या नात्यांतील परस्परसंबंध जाणवतो, स्त्रीविषयक दृष्टिकोन जाणवतो, उपदेशाचे देशी बोल जाणवतात, सहजसुंदर विनोदाची खोली जाणवते.
त्यांच्या कवितांतून गद्य वाक्प्रयोग, बोली भाषेची नाना सुंदर वळणे, बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर आणि सरलता यांचा मिलाफ जाणवतो. त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशीच जाऊन भिडतो. वेडीवाकडी वळणं न घेता येणारी सहजसुंदर अशी बहिणाबाईची कविता आपल्याला शब्दांतून जाणवते.
बहिणाबाईच्या कवितांतून निसर्ग आपल्याला अनेक रूपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडित निसर्गाची कितीतरी रुपं बहिणाबाईच्या कवितांतून भेटतात. माहेरची ओढ बहिणाबाईच्याही अनेक कवितांतून जाणवते. जसे, “लागे पायाला चटके, रस्ता तापीसनी लाल । माझ्या माहेराची वाट, माले वाटे मखमल” बहिणाबाईच्या कवितांतून माहेरचे वर्णन जितके आणि जसे येते तितक्याच वेळा आणि त्याच सहजतेने त्या सासरचे सासरच्या माणसांचे वर्णन करतात. उदाहरणार्थ, “खटल्याची घरामधी, देखा माझी सग्गी सासू, । सदा पोटामधी माया तसे डोयामधी आंसू. “
अध्यात्म आणि समाजप्रबोधन
बहिणाबाईनी काही कवितांतून वापरलेल्या उपमा चपखल आहेत. ‘घरोट्याला’ म्हणजे ‘जात्याला’ बहिणाबाई भरल्या आभाळाची उपमा देतात. त्यातून माणसाला जगवणारं पीठ येतं. म्हणून त्या म्हणतात – “ज्याच्यातून येतं पीठ, त्याले जातं म्हनू नही.” स्वार्थ सोडून माणसाने कधीतरी त्यागाचा मार्गही अवलंबला पाहिजे, असा उपदेशही बहिणाबाई जाता जाता करतात जेव्हा त्या म्हणतात “नको लागू जीवा, सदा मतलबासाठी ही रिताचे देनं घेनं नही पोटासाठी.” मनाचं वर्णन त्या ‘कधी खसखशीएवढं बारीक तर कधी आभाळाएवढं विशाल’ असंही करून जातात.
सामाजिक समस्या सुद्धा बहिणाबाईनी काव्यातून मांडल्या आहेत. जसे “ऐका संसार, संसार दोन्ही जीवाचा इचार देतो दुःखाला होकार अन् सुखाले नकार “ह्या चार ओळींत त्या संसाराचे सारे गुपित सांगून जातात. त्यांची ‘कशाले काय म्हनू नही’ ही रचना मराठी माणसाच्या मनाला भुरळ पाडणारी आहे. शेतकरी जीवनातल्या अनुभूतींचा आणि त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा यातून प्रत्यय येतो.
“बिया कपाशीन उले त्याला बोंड म्हनू नहीं हरी नामाईना बोले त्याले तोंड म्हनू नाही नाही वा-यानं हाललं त्याले पान म्हनू नाही ।” बहिणाबाईच्या या स्फुट ओव्यांतून माणसाला जीवनाचे दर्शन घडते.
मा.श्रीमती रक्षा निखिल खडसे
(लेखिका केंद्रीय राज्यमंत्री आहेत.)