Deprecated: Optional parameter $limit declared before required parameter $default_limit is implicitly treated as a required parameter in /home/u648549124/domains/rudratech24.com/public_html/wp-content/plugins/hostinger-affiliate-plugin/src/Shortcodes/ShortcodeManager.php on line 80
देणार्‍याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे!! - RudraTech
Sunday, December 22, 2024
Homeदेणार्‍याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे!!

देणार्‍याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे!!

आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात ; जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. अशा वेळी जगणे परावलंबी होऊन जाते. अशा विमनस्क अवस्थेत मनाला उभारी मिळणे खूप आवश्यक होउन जाते अन्यथा दैनंदिन जीवनातील रुक्ष जीवनशैलीतली व्यावहारिक शुष्कता मनात खोल रुजते अन माणूसपणच हरवून जाते. अशा अवस्थेत जीवनाला वळण देणारी एखादी भव्य कविता समोर आली तर जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलून जातात. विंदा करंदीकरांची अशीच एक कविता आहे जी जगणे सुसह्य करते अन जीवनातले नवे अर्थ नव्या संदर्भाने समोर मांडते. कवितेचे नावच आहे ‘घेता’. यावरून यातील आशयाची कल्पना यावी. अगदी उदात्त आशयाची ही कविता वाचकाला समृद्ध करून जाते यात संदेह नाही…

देणार्‍याने देत जावे

“देणार्‍याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे”

हिरव्या पिवळ्या माळावरुनी,
सह्याद्रीच्या कड्यावरुनी,
छातीसाठी ढाल घ्यावी!!

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून,
पिसाळलेली आयाळ घ्यावी!
भरलेल्या भिमेकडून,
तुकोबाची माळ घ्यावी!!

देणार्‍याने देत जावे,
घेणार्‍याने घेत जावे!
घेता घेता एक दिवस,
देणार्‍याचे हात घ्यावे!!

या कवितेत त्यांनी कोणाकडून काय घ्यावे याचे जे वर्णन केले आहे ते त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. अत्यंत लालित्यपूर्ण अशा या वर्णनात वीररस आणि भक्तीरस यांचा मनोहारी संगम आहे, शिवाय त्यात गेयतादेखील आहे. ‘हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी’ हे वर्णन प्रत्येक मरगळलेल्या मनगटात रग भरणारे आहे, यात एक अलौकिक जोश आहे. जीवनातल्या त्याच त्या गोष्टींना कंटाळून एक साचेबद्ध आकार आयुष्याला जेंव्हा प्राप्त होतो तेंव्हा ‘वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे’ अशी अभूतपूर्व शिकवण इथे आहे. ‘रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे’ असे सांगताना कवी अगदी हळुवारपणे माती आणि रक्ताचे नाते अधोरेखित करतात. मनापासून ते नात्यापर्यंतची कुठलीही समस्या समोर आली तर तिचे मूळ आपल्या मनात – पर्यायाने विचारांच्या अंकुरात याचे उत्तर सापडते. पण हे उत्तर नजरेस पडण्यासाठी मातीशी नाळ घट्ट पाहिजे. म्हणून रक्तातल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे असे कवी म्हणतात. जीवनातला जोश आणि होश दोन्ही कमी होत चालल्यावर ‘उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी’ असं बेभान पण संयत सांगणं इथे आहे. ‘भरलेल्याश्या भिमेकडून तुकोबाची माळ घ्यावी’ या पंक्तीतून कवितेचा बाज बदलतो आणि आशय अधिक गडद होतो.
भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले की मग येते ती निवृत्ती अन त्यातून देण्याची भावना आपल्या ठायी निर्माण होते. ही भावनाच द्यायला शिकवते अन शेवटी विंदा कवितेला कलाटणी देतात अन लिहितात की,
‘घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे!!”

ही कविता मरगळलेल्या मनाला उभारी देते, पिचलेल्या मनगटात जोश भरते आणि अनेकविध प्रश्न माथी मिरवत जगण्याचे अर्थ हुडकत फिरणारया संभ्रमित मनाला उत्तुंग असे प्रेरणादायी उत्तर देते.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!